Ad will apear here
Next
नंदीबैल, बकरा आणि गाय!
‘पेटा’ ही संस्था मुक्या प्राण्यांसाठी अनेक प्रकारची कामे करत असते. गेल्या आठवड्यात ‘पेटा’ने भाषेच्या प्रांतातही पाऊल टाकले आणि धमाल उडवून दिली. भाषेमध्ये, खास करून इंग्रजीत, प्राण्यांशी संबंधित अनेक वाक्प्रचारांवर आणि म्हणींवर ‘पेटा’ने आक्षेप घेतला आहे. हे वाक्प्रचार आणि म्हणी प्राण्यांशी क्रूरतेने वागण्यास प्रोत्साहन देतात आणि म्हणून त्यांच्याऐवजी प्राण्यांशी दया, करुणा आणि प्रेमाने वागणारे वाक्प्रचार वापरावेत, असा विचार ‘पेटा’ने मांडला आहे. या विषयाची चर्चा करणारा हा लेख...
.........
पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट टू अॅनिमल्स (पेटा) ही तशी प्रसिद्ध संस्था. मुक्या प्राण्यांसाठी अनेक प्रकारची कामे ही संघटना करत असते. या आठवड्यात मात्र ‘पेटा’ने भाषेच्या प्रांतातही पाऊल टाकले आणि धमाल उडवून दिली. भाषेमध्ये, खास करून इंग्रजीत, प्राण्यांशी संबंधित अनेक वाक्प्रचारांवर आणि म्हणींवर ‘पेटा’ने आक्षेप घेतला आहे. हे वाक्प्रचार आणि म्हणी प्राण्यांशी क्रूरतेने वागण्यास प्रोत्साहन देतात आणि म्हणून त्यांच्याऐवजी प्राण्यांशी दया, करुणा आणि प्रेमाने वागणारे वाक्प्रचार वापरावेत, असा विचार ‘पेटा’ने मांडला आहे. हा विचार दर्शनी स्वरूपात चमकदार आहे. सोशल मीडियातील अनेक लोकांनी त्याची खिल्ली उडविली, तर काहींनी त्याचे स्वागत केले. काहींनी प्राण्यांशीच संबंधित दुसरे वाक्प्रचार वापरून त्याला जोड दिली. परंतु या सर्व मंथनातून एकच गोष्ट पुढे आली ती हेच, की म्हणी आणि वाक्प्रचार हा आपल्या जीवनाचा एक सारांश असतो. जीवनाच्या सामान्य व्यवहारांतून त्यांना वेगळे काढता येत नाही.

इंग्रजीतील अनेक वाक्प्रचार प्राणीविरोधी आहेत. तसे ते हिंदी किंवा मराठीतही आहेत. अशी भाषा वापरणाऱ्यांवर प्राण्यांशी क्रूरपणाने वागण्याचे संस्कार होतात, असे ‘पेटा’चे म्हणणे आहे. त्यासाठी ‘पेटा’ने काही वाक्प्रचारांची उदाहरणे दिली आहेत आणि त्यासाठी पर्यायी मृदू, करुणामय आणि शांततावादी वाक्प्रचारही दिले आहेत. उदाहरणार्थ, ‘टू किल टू बर्डस् विथ वन स्टोन’ (एका दगडात दोन पक्षी मारणे) या वाक्याऐवजी ‘टू फीड टू बर्डस् विथ वन स्कोन’ (दोन पक्ष्यांना एकाच वाडग्यात खाऊ घालणे) असा वाक्प्रचार वापरावा, असे ‘पेटा’ने सुचवले आहे.

त्याच धर्तीवर ‘बी दी गिनिपीग’ (प्रयोगाचा उंदीर बनणे), ‘बीट दी डेड हॉर्स’ (मृत घोड्याला फटकावणे) आणि ‘टेक दी बुल बाय हॉर्न’ (बैलाला शिंगावर घेणे) असे सामान्य वाक्प्रचार टाळावेत. त्याऐवजी ‘प्रयोगनळी बनणे’, ‘मृत घोड्याला खाऊ घालणे’ आणि ‘काट्यांसोबत फुले घेणे’ असे वाक्प्रचार वापरावेत, असे संघटनेने सुचविले आहे. ‘शब्द महत्त्वाचे असतात आणि सामाजिक न्यायाची आपली जाणीव जसजशी उत्क्रांत होत जाते तसतशी भाषाही उत्क्रांत होत जाते... ज्याप्रमाणे वंशभेदी भाषा वापरणे अस्वीकारार्ह बनले आहे, त्याप्रमाणे प्राण्यांशी क्रूरतेने वागण्याला किरकोळ ठरविणारे शब्दही नष्ट होतील,’ असा आशावादही ‘पेटा’ने व्यक्त केला आहे.

गंमत आहे की नाही? आपणही प्राण्यांशी संबंधित असे किती तरी वाक्प्रचार आणि म्हणी सहजगत्या वापरतो. असे करताना आपण काही वावगे करतो आहोत, असे आपल्याला वाटतही नाही. किंबहुना आपल्या ते लक्षातही येत नाही. उदाहरणार्थ, आपल्या मराठी भाषेतील काही म्हणी किंवा वाक्प्रचार पाहा - ‘शेळी मेली जिवानिशी खाणारा म्हणतो वातड’, ‘तुला न मला, घाल कुत्र्याला’, ‘म्हशीवर पाऊस’, ‘ससेहोलपट होणे’ किंवा ‘लांडगेतोड करणे’ इत्यादी.

शब्द या आपल्या भावना व्यक्त करतात आणि आपण वापरत असलेले शब्द दुहेरी काम करतात – एक तर ते आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रतिमांचा वापर करतात. आपली गोष्ट दुसऱ्याच्या मनावर ठसविण्यासाठी आपल्या आणि त्या व्यक्तीच्या ओळखीच्या प्रतिमा आपण उपमेसाठी वापरतो. उदाहरणच घ्यायचे तर, ‘एखाद्याला कुत्र्यासारखा झोडपला’ असे आपण सहजपणे म्हणतो, तेव्हा कुत्री ही झोडपण्यासारखीच असतात हे आपल्या आणि त्या समोरच्या व्यक्तीलाही मान्य असते. ‘गाढवासमोर वाचली गीता’ असे म्हणतो, त्या वेळी गाढवासमोर ज्ञानाची कोणतीही गोष्ट सांगितली, तरी त्याला काहीही समजणार नाही, हे सर्वांनाच मान्य असते.

आपण ही वाक्ये सर्रास वापरतो, ऐकतो. त्यामुळे आपल्या जीवनाचा ती भाग बनतात आणि परत ती कृतीमध्ये उतरतात. थोड्याशा जड भाषेत सांगायचे म्हणजे ही वाक्ये व त्यातील भावना आपल्या अबोध मनाचा भाग बनतात. म्हणी आणि वाक्प्रचार म्हणजे या अबोध मनातील भावनांचे दृश्य (किंवा श्राव्य) रूपच असतात.

त्यामुळेच विद्यार्थ्यांना प्राण्यांना अनुकूल भाषा वापरण्यास शिकविली, तर त्यांच्यामध्ये प्राण्यांबद्दल सकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात, असे जर ‘पेटा’ला वाटत असेल, तर त्यात काही नवल नाही. लोककथांप्रमाणेच म्हणी व वाक्प्रचार हेसुद्धा लोकसाहित्यातून आलेले विचारधन. ही एक छोटेखानी गद्य वाङ्म्यकृती तर असतेच, पण पिढ्यान् पिढ्यांच्या संचित ज्ञानाचीही ती अभिव्यक्ती असते. केवळ प्राणीच कशाला, इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेत जागा, काळ आणि अनुभवांवरून असे ज्ञान जमा होत जाते. या प्रत्येक वाक्यात आपले पूर्वज कधी काळी कसे राहत होते, त्यांनी काय केले आणि त्यांना काय अनुभव आले, याची एक गाठच मारून टाकलेली असते. प्रत्येक समाजाच्या संस्कृतीमधील शहाणपण एका-एका वाक्यात सामावलेले असते आणि ते पुढच्या पिढीला सोपविलेले असते. ज्यांचा अर्थ सहजासहजी लागत नाही, त्यासाठी त्या समाजाचाच भाग असावे लागते, असे अनेक शब्द जगातल्या प्रत्येक भाषेत सामावलेले असतात.

म्हणूनच सोन्याची लंका किंवा लंकेची पार्वती हे केवळ शब्द नसतात. त्यात रामायण-पुराण दडलेले असते. नाथाघरची खूण या दोन शब्दांत परंपरा सामावलेली असते. पानिपत होणे या दोन शब्दांत एक इतिहास दडलेला असतो. हिंदीत जेव्हा एखादी व्यक्ती ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ असे म्हणते तेव्हा वेळ-प्रसंगानुसार बदलणारी एक संपूर्ण प्रवृत्ती सामावलेली असते. नमनाला घडाभर तेल असे म्हटले, की मराठी माणसाला सुरुवातीलाच लावलेले पाल्हाळ असे चटकन लक्षात येते; मात्र अन्य भाषकांना त्यासाठी नमन म्हणजे काय हे समजावून सांगावे लागते.

अशा प्रकारे एका-एका शब्दाचा धागा पकडून आपण एखाद्या संस्कृतीचा सगळा पट उलगडून पाहू शकतो. अन् म्हणूनच ‘पेटा’सारखी संस्था जेव्हा भूतदया म्हणून का होईना, भाषेला नवीन वळण द्यायची गोष्ट करते, तेव्हा ती संपूर्ण जीवनप्रवाहालाच वळण देणारी गोष्ट ठरते.

आपल्या मराठीतील बळीचा बकरा होणे किंवा नंदीबैल असणे या वाक्प्रचारांना नवीन रूप देता येईलही; पण त्या वाक्यांतून येणाऱ्या भावनेचे काय? गरीब गाय नि पोटात पाय ही म्हण रद्द करता येईलही; पण त्या अनुभवाचे काय करायचे? प्रश्न मोठे गमतीशीर आहेत आणि त्यांची उत्तरे मिळोत तेव्हा मिळोत. परंतु ‘पेटा’चा प्रस्ताव म्हणजे गालिबच्या भाषेत, ‘दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है!’ 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZVDBV
Similar Posts
हेच भाषेचे लोकशाहीकरण! ग्रेटचेन मॅककुलोच या लेखिकेचे ‘बीकॉज इंटरनेट - अंडरस्टँडिंग दी न्यू रूल्स ऑफ लँग्वेज’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ते पुस्तक म्हणजे ‘नेट’क्या भाषिक बदलांचे दस्तावेजीकरण आहे. इंटरनेटला आलेले महत्त्व आणि त्याच्यामुळे अनौपचारिक लेखनामध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळे भाषेत परिवर्तन शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे
स्वल्पविराम... मुक्त पत्रकार आणि अनुवादक देविदास देशपांडे यांचे भाषाविषयक सदर दर सोमवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होत होते. त्याचा समारोप करणारा हा लेख...
भाषांच्या जंजाळात अडकलेला फेसबुकचा ‘स्वच्छाग्रह’ द्वेषयुक्त साहित्य आणि अन्य आक्षेपार्ह मजकुराच्या विरोधात फेसबुकने जोरदार अभियान सुरू केले आहे; मात्र आता या अभियानाला भाषांमुळे खीळ बसत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या स्मार्टफोनमुळे फेसबुकला अनेक नवे वापरकर्ते मिळाले खरे; मात्र त्यातून फेसबुकवरील साहित्यात नवनवीन भाषांची भर पडत आहे. यातूनच मजकुराची
राष्ट्रभाषा ते राजभाषा – हिंदीचा घटनात्मक प्रवास अडीच वर्षांच्या मेहनतीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्थ नेतृत्वाखाली राज्यघटना तयार झाली. ‘बहुप्रसवा वसुंधरा’ अशा भारताच्या वैविध्याचे आणि त्यातील विविध समस्यांचे प्रतिबिंब त्यात न पडते तरच नवल होते. अन् या संविधान सभेतील चर्चांकडे पाहिले, तर भाषा हाच त्यातील सर्वांत संवेदनशील मुद्दा असल्याचे लक्षात येते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language